दिल्लीच्या खान मार्केटजवळ, हाय-एण्ड हुमायूं रोडच्या एका कोपऱ्यात, समोरच्या भिंतीला शोभून दिसणारे मोठे ‘स्टार ऑफ डेव्हिड’चे चिन्ह आहे, हे चिन्ह असलेली ही एक सामान्य दिसणारी रचना आहे. ही सामान्य दिसणारी रचना शोधणे सोपे काम नाही कारण ही रचना ज्या समुदायाचे प्रतिनिधित्व करते, त्या ज्यूंना, या भागात राहणाऱ्यांकडून फारच कमी ओळखले जाते. ही वास्तू म्हणजे सिनेगॉग जुडाह हायम हॉल, हे ज्यूंसाठी दिल्लीतील एकमेव प्रार्थनास्थळ आहे. ज्यू हे भारतातील अल्पसंख्याक गटात येत असून त्यांचा प्रवेश भारतात सुमारे २००० वर्षांपूर्वी झाला.
“इस्रायल माझ्या हृदयात आहे, भारत माझ्या रक्तात आहे,” असे सिनेगॉग जुडाह हायम हॉलचे रबाय (मुख्य पुजारी) इझेकील आय मालेकर म्हणतात. हे रबाय म्हणून १९८० सालापासून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता सिनेगॉगचे मुख्य सचिव आणि काळजीवाहू म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातील ज्यूंसाठी ते प्रथम भारतीय आहेत आणि मग ज्यू (दुसऱ्या क्रमांकावर) आहेत. ज्यू आणि भारतीय यांच्यातील संबंधांच्या दीर्घ इतिहासाकडे मागे वळून पाहताना, भारत हा जगातील सर्वात सहिष्णु देश आहे, जेथे त्यांना ज्यू विरोधी अनुभव कधीही आला नाही, असा दावा ते करतात.
भारताच्या बाहेरून येवून या भारतीय संस्कृतीत सामावून जाण्याच्या वैशिष्ट्यासाठी ज्यू समाज प्रसिद्ध आहे. सध्या, भारतभर सुमारे ६००० ज्यू असून, त्यांची ‘भारतीय ज्यू’ अशी ओळख आहे. हा समाज संख्येने लहान असला तरी त्यांनी भारताच्या सांस्कृतिक- ऐतिहासिक आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
आणखी वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?
भारतातील ज्यू शाखा
प्रोफेसर नॅथन कॅट्झ यांनी भारतातील ज्यू समाजावर अभ्यास केला असून भारत आणि ज्यूं विषयी विधान करताना ते नमूद करतात की, भारतातील ज्यू गट हा बाहेरून आलेला असला तरी हा गट आपली मूळ ओळख पूर्णपणे कायम राखून होता. ते पुढे म्हणतात, ही घटना केवळ ज्यूंच्या बाबतीतच नाही तर झोरास्ट्रियन, ख्रिश्चन आणि तिबेटी बौद्धांच्या बाबतीतही दिसून येते. परंतु, ज्यूंमध्ये, त्यांनी केवळ त्यांची ओळख कायम ठेवली एवढेच नाही, तर स्थानिक सांस्कृतिक प्रवृत्तींच्या प्रभावाचेही स्वागत केले. भारतातील ज्यू, जगभरातील लोकांपेक्षा वेगळे अस्तित्त्व राखून होते, त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार आणि देशातील मूळ आख्यायिकांनुसार ते कोचीन ज्यू, बेने इस्रायली, बगदादी ज्यू आणि बेनेई मेनाशे या चार भिन्न गटांमध्ये विभागले गेले. हे चार गट वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले, त्या कालखंडातील भारतातील- प्रादेशिक ऐतिहासिक शक्तींनुसार त्यांची ज्यू ओळख निर्माण झाली.
आख्यायिकेनुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकात ‘कोचीन ज्यू’ हे केरळच्या किनाऱ्यावर पोहोचले. केरळच्या वेगवेगळ्या भागात तसेच वेगवेगळ्या कालखंडात राज्य करणाऱ्यांमध्ये कोल्लम/ वेनाड आणि कोचीनचे राजे, चेर राजवंशाचा राजा चेरामन पेरुमल यांचा समावेश होता. या राजांनी ज्यूंचे आपल्या राज्यात स्वागत केले.
बेने इस्रायली, जो संख्यात्मकदृष्ट्या भारतातील सर्वात मोठा ज्यू समूह होता, ते महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर स्थायिक झाले. त्यांचे या ठिकाणी कधी आगमन झाले हे निश्चित माहीत नाही, परंतु स्थानिक आख्यायिकेनुसार १६०० ते १८०० वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवर ज्यूंचे जहाज धडकले होते. त्याच कथेनुसार, त्या जहाजातील फक्त १४ लोक जिवंत राहिले आणि त्यांनी मुंबईच्या जवळ असलेल्या नागाव नावाच्या गावात आश्रय घेतला. वर्षानुवर्षे, ज्यू समाजाच्या उत्पत्तीची ही कथा इस्रायलच्या दहा हरवलेल्या जमातींच्या आख्यायिकेमध्ये जोडली गेली आहे . बेने इस्रायली हे इस्रायलच्या उत्तरेकडील भागातून आल्याचे मानले जाते. कोचीन ज्यूंप्रमाणेच, बेने इस्रायलींनीही आपल्या आगमनाच्या कथांची सांगड स्थानिक लोककथांशी घातली. बहुतेक बेने इस्रायली इतिहासकारांनी भारतातील त्यांचे मूळ आणि चित्पावन ब्राह्मण यांच्यातील समानतेकडे लक्ष वेधले, जे जहाजाच्या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर स्थायिक झाल्याचे मानले जाते.
बगदादी ज्यू हे भारतात ज्यूंच्या प्रवेशाच्या सर्वात अलीकडील लाटेचा भाग असल्याचे म्हटले जाते. १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, बगदादी ज्यूंनी कलकत्ता (आता कोलकाता), बॉम्बे (मुंबई) आणि रंगून (यंगून) सारख्या भारतातील बंदर शहरांमध्ये एक मजबूत उद्योजक वर्ग तयार केला असे मानले जाते. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, बगदादी ज्यूंची संपत्ती आणि दर्जा वाढला आणि त्यांनी ज्यू शाळा, कोशेर बाजार आणि धार्मिक स्नानगृहे स्थापन केली.
ज्यू आणि भारतीय यांच्यातील संस्कृतीच्या देवाणघेवाणीबद्दल बोलताना, रबाय मालेकर यांनी नमूद केले की प्रत्येक गटाने स्थानिक संस्कृतीचे अनेक पैलू स्वीकारले आहेत. “इस्रायलला परत गेलेले बेने इस्रायली अजूनही मराठी बोलतात, ते स्थानिक महाराष्ट्रीय पोशाख घालतात आणि लग्नात मंगळसूत्र घालतात,”. सिनेगॉगमध्ये खोबरेल तेल आणि कापराचा वापर करतात, लग्नसमारंभात हळद आणि मेहेंदी लावतात, ही भारतातील ज्यू संस्कृतीची आणखी काही उदाहरणे आहेत, ज्यावर भारतीयत्वाचा प्रभाव असल्याचे दिसून येते. १९४८ साली इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर, मोठ्या संख्येने ज्यूंनी मायदेशी परतण्याच्या आशेने भारत सोडले. बहुतेक लोक चांगली जीवनशैली आणि समृद्धीच्या आशेने गेलेले असले तरी भारतासोबतचे संबंध तोडणे सोपे नव्हते.
आणखी वाचा: इस्रायलमध्ये स्थलांतर भारतीय ज्यूंसाठी (बेने इस्रायली) सोपे का नव्हते?
भारतातील प्रसिद्ध ज्यू
भारतातील ज्यूंच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली नावांपैकी एक नाव म्हणजे व्यापारी शेख डेव्हिड ससून. ससून यांचे १८२८ साली मुंबईत आगमन झाले. त्यांच्या आगमनाने बगदादी ज्यूंच्या भारतातील समृद्धीची सुरुवात झाली. मुंबईत असताना आयात-निर्यात व्यापारात त्यांचे वर्चस्व होते. प्रथम अफूपासून सुरुवात करून, त्यांनी आपले व्यापारी हितसंबंध रिअल इस्टेट आणि कापड क्षेत्राकडे वळवले आणि हळूहळू जगातील सर्वात श्रीमंत ज्यू साम्राज्यांपैकी ते एक झाले. ससून साम्राज्य लवकरच मुंबई ते कलकत्ता ते शांघाय, अॅमस्टरडॅम, लंडन आणि न्यूयॉर्कपर्यंत पसरले. त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी ते जितके प्रसिद्ध होते तितकेच ते एक प्रतिष्ठित परोपकारी देखील होते. त्यांनी अनेक सिनेगॉग, वसतिगृहे, शाळा, रुग्णालये, ग्रंथालये आणि धर्मादाय संस्था उभारल्या.
कलकत्त्यामध्ये ज्यू लोकांचा ठसा उठावदार असल्याचे जाणवते. न्यू मार्केटमधील प्रतिष्ठित बेकरी नाहौम अँड सन्स हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. नाहौम इस्रायलने १९०२ साली या बेकरीची स्थापन केली, नंतरच्या काळात ही बेकरी त्यांचा मुलगा डेव्हिड नाहौम याने सांभाळली. त्यांचे २०१३ साली निधन झाले. आपल्या फ्रूट केकसाठी ही बेकरी प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांमध्ये ही बेकरी विशेष प्रसिद्ध होती. नंतर स्थानिक बंगाली जनताही या बेकरीची चाहती झाली.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताला विजय मिळवून देण्यासाठी ओळखल्या जाणार्या, जेएफआर जेकब यांचा जन्म १९२४ साली कलकत्ता येथे एका ज्यू कुटुंबात झाला होता. त्यांचे कुटुंब भारतात १८ व्या शतकापासून होते. जेकब यांनी युद्धादरम्यान भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले, युद्धातील त्यांच्या कर्तृत्त्वासाठी त्यांचा सन्मानही करण्यात आला होता.
इतर अनेक भारतीय ज्यू आहेत ज्यांनी कला, नाट्य, व्यवसाय आणि इतर अनेक पैलूंमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. अनेक वर्षांच्या एकात्मतेनंतर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वानंतर ज्यूंनी आता भारतात अल्पसंख्याक दर्जाची मागणी का केली, असे विचारले असता रबाय मालेकर म्हणाले की, “भारताच्या प्रगती आणि विकासात आमचे योगदान मोठे आहे. किमान प्रतिकात्मक म्हणून, भारत सरकार आता आमच्या लहान समुदायाला देशातील इतर कोणत्याही अल्पसंख्याक गटाला दिलेले फायदे देऊ शकते.